आपला जिल्हा

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कार्यस्थळावर मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार

हलगी, घुमके व लेझीम पथकाच्या निनादात जल्लोषी मिरवणूक

सजविलेल्या रथातून फुलांच्या वर्षावात निघाली मिरवणूक

बेलेवाडी काळम्मा, दि. १:
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कामगार हे कर्मचारी नाहीत तर माझ्या कुटुंबाचे सदस्यच आहेत, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. तुम्ही सगळेजण माझ्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून राबल्यामुळेच सलग सहाव्यांदा ऐतिहासिक विजय साकारला. हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आणि राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, असेही ते म्हणाले.

बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित सत्कार समारंभात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, हा कारखाना म्हणजे गटाचा स्वाभिमान आणि जिद्दीचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांसह बेरोजगार कार्यकर्त्यांच्या रोजीरोटीसाठीच हा महाकाय प्रकल्प उभारल्याचेही ते म्हणाले. तुम्ही सगळेजण हा कारखाना माझा आहे, या आत्मीयतेच्या भावनेने काम करा. संस्थेचे हित तेच माझे हित या भावनेने काम केल्यास तुम्हा सर्वांचे भलं होईल.

वरात निघाली असती……!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कारखान्याच्या कामगारांनी सजविलेल्या रथातून फुलांच्या वर्षावात अत्यंत जल्लोषी मिरवणूक काढली. हे एवढे मोठे नियोजन केल्याचे मला जर आधीच माहीत असते तर येताना पत्नीलाही घेऊन आलो असतो. म्हणजे आमची वरातच निघाली असती……!

गरज धोरणात्मक बदलाची…!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्रासह सबंध देशभर साखर कारखानदारी अडचणीत आहे. साखर कारखानदारीसह शेतकरी आणि कामगार टिकायचा असेल तर केंद्राने धोरणामध्ये बदल करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक बदल न स्वीकारल्यास साखर कारखानदारी मोडीत निघेल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्हा साखर कामगार सभेचे जनरल सेक्रेटरी शामराव मोरे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांचे विकास कामांबरोबरच सेवाभावी कामही प्रचंड मोठे आहे.

कोल्हापूर जिल्हा साखर कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष गुरव म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांना गोरगरिबांचा कळवळा आहे आणि त्यांच्या कल्याणाची तळमळ आहे. ते लाखोंचा पोशिंदा आहेत. अशी माणसं क्वचितच जन्माला येतात, त्यांना शत्रूही फार असतात.

शरद साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संपतराव चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रासह संबंध देशभरातील साखर कारखानदारी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी साखर कारखानदारीचे पालकत्व स्वीकारावे, तरच हा उद्योग टिकेल.

कामगार संघटनेचे उपाध्यक्ष काशिनाथ घोडके म्हणाले, सरसेनापती साखर कारखान्यामुळे आपणा सर्वांची स्वप्ने साकार होणार आहेत. हा कारखाना देशात अव्वल होण्यासाठी आपण सर्वजण एकसंघपणे मिळून योगदान देऊया.

व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार फेडरेशनचे खजानिस उदय भंडारी, शरद सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष बबन भंडारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी, विभाग प्रमुख आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी केले. प्रास्ताविक कामगार संघटनेचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी मानले.

शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.